Monday, March 29, 2010

रम्य वेळनेश्वर !!


बर-याच दिवसांनी सलग ३ दिवस सुट्टीचा योग आला होता. अगोदरपासुन ठरवल्याप्रमाने मी माझ्या गावी पलूस ला जाउन तिथुन मित्रांसोबत कोकणात जायचा प्लन केला होता. शुक्रवारी संध्याकाळी इथुन गावी गेलो.ठरल्याप्रमाने मी , अमोल , राजु , भानुदास आणी संदिप असे आम्ही ५ जण शनिवार च्या भल्या पहाटे ४ वाजता आवरुन माझ्या कार ( वॅगन आर) मधुन निघालो. आद्ल्या दिवशी आफ़िस करुन रात्री घरी जाण्यासाठी जवळपास २०० कि मि चे ड्रायविंग करुन जाम कंटाळा आला होता. त्यात बॅग भरुन झोपायला रात्रीचे १२ वाजले होते. त्यामुळे थोडा थकवा जाणवत होता.

आम्ही निघालो आणि संदिपच्या आग्रहाखातर दुधोंडी गावातल्या हनुमान मंदिरात जाउन दर्शन घेउन पुढे जायचे ठरले. दर्शन घेउन निघालो. आमचा प्लन होता कि इस्लामपुर , पेठ , शिरोळ , मलकापुर मार्गे गनपतिपुळे करुन तिथेच समुद्रकिनारी मुक्काम करुन दुस-या दिवशी वेळनेश्वर करायचे.. असे ठरले होते.

दर्शन घेउन निघताच आमच्या गप्पा चालु झाल्या . जवळ पास ८ वर्षानी आम्ही परत अश्या ट्रिप ला निघालो होतो. २००० च्या आसपास आम्ही कोकन ट्रिप केली होती आणि त्या नंतर एका गल्लीत राहत असुन सुद्धा साधा फोन करुन खुशाली पण विचारण्याची फ़ुरसत मिळत न्हवती. सगळे जण आयुष्याचे रहाटगाडगे ओढण्यात बरेच मश्गुल झालो होतो..अर्थात कुणाला दोष देण्यात अर्थ न्हवता. मागच्या महिन्यात घरी गेलो होतो तेव्हा असेच सगळे एका जागी भेटलो होतो जिथे आम्ही ८ वर्षापुर्वी भेटायचो.. आणी विषय काढता काढता कोकनात जायचेच असे ठरवले.. आणी लगेच प्लन करुन अंमलबजावनी केली सुद्धा. ८ वर्षे कशी गेली ते समजले सुद्धा नाही पण मैत्रिचा ओलावा तसाच टिकुन होता. थोडे पाणी घातले आणि पुन्हा पहिले दिवस आठवले. हि मित्र मंडळी तशी माझ्या मोठ्या भावाचे क्लासमेट . एक सुद्धा माझ्या वर्गातला न्हवता. पण का कुणास ठाउक ह्यांच्याबरोबर माझे मस्त ट्युनिंग जमले होते पहिल्या पासुन. माझ्या घरातल्याना अजुन हा प्रश्न पडतो.. भाउचे दोस्त असुन माझे सुत ह्या मंडळींबरोबर कसे काय जमते ते! असो......!!

सकाळचे ५ वाजले असतिल. बोलता बोलता कोयनानगर चा विषय निघाला आणि आमचा प्लन बदलला सुद्धा . कराड , पाटण , कोयना नगर मार्गे चिपळुन आणि गुहागर वरुन वेळनेश्वर असा मार्ग पक्का झाला. विकिमापिया वर अगोदरच सगळे रस्ते गावे पाहुन नोट करुन ठेवली होती त्यामुळे सगळा प्लन डोक्यात पक्का बसला होता. अगोदर गनपतिपुळे करुन वेलनेश्वर ला येउन चिपळुन कोयनानगर मार्गे घरी येणार होतो तो आता उलटा झाला , कोयनानगर मार्गे जाउन वेळनेश्वर करुन , गनपती पुळे वरुन हातखंबा वरुन मलकापुर मार्गे फ़िक्स केला.

कृष्णा नदी वरिल सूर्योदय !!



एव्हाना कराड सोडले आणी पाटण रस्त्याला लागलो. आणि नेहमि प्रमाने वाटेत टोल नाका लागला. इथे सुद्धा.... सकाळी सकाळी तोंडातुन शिव्या नकोत म्हनुन शांत बसलो.. हे राजकारणी ( स्पेशली काँग्रेस वाले ) एक दिवस असा आणतील कि मला श्वास घेण्यासाठी पण एक दिवस "टोला" आकारतील..... !!
राजकारणाचा विषय बाजुला ठेवला आणि बाकीच्या गप्पा चालु केल्या.. ८ वर्षानंतर असे निवांत भेटत असल्या मुळे गप्पा मारायला पुष्कळ विषय होते. हि आमची गँग जवळ्पास मि ६ किंवा ७ वि मधे असल्या पासुन आमच्या गल्लीत आणी जवळ असणा-या शाळेमधे धुमाकुळ घालत होती.. सुट्टिच्या दिवशी शाळेत अभ्यासाला जाउन आंबे , चिंचा पाडणे. सुर-पाट्या खेळने. एकत्र बसुन डबा खाणे .. एक का दोन अश्या हाजारो गोष्टी आजाही पक्क्या लक्षात आहेत. सुट्टीच्या दिवशी शाळेत असलेले अस्लम , बंगाल , आणि कित्येक शिपाई हे आम्ही उपद्रवी आहेत असे समजुन आमच्या मागे लागायचे.. त्यांना पळवता पळवता (ताणुन ताणुन) लपुन बसण्यात जि मजा होती ती आज च्या शाळेत नाही राहीली. आजही जेव्हा घरी जातो तेव्हा हिच शाळा सुरुवातीला लागते. आजकाल ति अबोल वाटते.... जणु काही ति सुद्ध्दा आम्हाला आणी आमच्या करामतींना मिस करत असावी... शाळेतले दिवस ह्यावर एक अखंड ५/१० हजार पानांची कादंबरी सहज तयार होईल. ह्यावरुन तुमचा तुम्ही अंदाज करा किती करामती केल्या असतील.

हम पांच !!



साधारण ७ च्या आसपास आम्ही कोयनानगर ला पोहोचलो. आमच्या ग्रुप मधे फोटोग्राफ़ी आणि ड्रायव्हींग करणारा मि एकटाच होतो. त्यामुळॆ फ़ोटोग्राफ़ी साठी एकादे ठिकाण आवडले तर थांबत होतो. कोयनानगर ला कोयना धरण आणि नेहरु गार्डन पाहुन पुढे जाण्याचा बेत होता त्याअगोदर थोडे खाउन घ्यावे म्हणुन नेहरु गार्डन च्या समोरच असेलेल्या एका होटेल मधे ब्रेकफ़ास्ट करुन घेतला आणि गार्डन बघण्यासाठी निघालो. अतिशय उत्तम रित्या नियोजन करुन ही बाग बांधलेली आहे. तसेच बागेमधील एका ठिकाणावरुन कोयणा धरणाची अजस्त्र भिंत बघण्याची सोय केलेली आहे. बागे मधेच एक छोटे मुझीएम तयार केले आहे. त्यामधे धरणाच्या सुरुवातीच्या काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत च्या महत्वाच्या गोष्टीचे फोटोग्राफ्स आहेत. अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण असे हे प्रदर्शन आहे. तिथे धरणाच्या इतिहासावर एक चित्रपट पण दाखवला जातो पण तो ठराविक वेळी असल्यामुळे आम्हाला काही बघता नाही आला. बागे मधे लहान मूलाना खेळण्यासाठी एका ठिकाणी बर्याचश्या गोष्टी होत्या , झोपाळे घसरगुंडी असे काही काही बरेच प्रकार होते. बरयाच वर्षानी झोपाळयावर बसण्याचा आनंद घेतला. परत एकदा लहान व्हावेसे वाटले पण.....आमच्या पृथ्वीवर फ़क्त पुढे जाने किवा थांबने असे नियम असल्यामुळे परत लहान होण्याचा काही चान्स न्हावता .. :) परत एकदा सहकुटुम्ब इकडे यायचा बेत केला आणि बागे मधून बाहेर आलो..

बाहेरच्या छोट्या होटेल मधे परत एकदा चहा घेतला आमच्या ग्रुप मधे मी एकटाच सिगरेट फुकनारा आहे असा माझा समज होता. पण अमोल ने हा समज सार्थ पाने खोटा ठरवत एक सिगरेट पेटवाली आणि चालू झाला. लाइट.....कैमरा.... एक्शन.....धुर..... जोरदार खोकला.....आनी बाकीचे हसत आहेत असा थोडक्यात नजारा होता.. त्याच्या पहिल्याच "कश" मधे मी समजुन चुकलो कि बरयाच दिवसानंतर हा प्राणी सिगरेट ओढत आहे :-) . खोकला थांबल्या नंतर त्याने आदराने (?) माझ्याकडे पाहिले . " हा कसा काय फुकतो?" असा एकंदरीत चेहरयावर प्रश्नार्थक भाव होता.... "नको पित जावुस लेका .. सवय लागेल.. !!" मी त्याला बोललो..

१० वाजले असतील .परत सगळे कार मधे बसलो आनी आम्ही मार्गस्थ झालो. आता पुढचा स्टॉप चिपलून आणि नंतर वेळनेश्वर . दोन ते अडीच तासाचा प्रवास अजुन होता. माझ्या कार मधे म्यूजिक सिस्टिम अजुन बसवलेली नाही ($) पण गाण्यांचा गोंगाट नसल्यामुळे एक फायदा होत होता कि आमचे बोलणे होत होते आणि जुन्या गोष्टीना आठवून आठवून त्यावर कधी हसने , कधी खिन्न होने असे होत होते. कोयना ते चिपलून हे अंतर जवळ पास ५० ते ६० कि मी चे आहे. पण हा रस्ता अगदी अप्रतिम आहे. घाटातली नागमोडी वळने , डोंगर , त्यात छोटी छोटी खेळन्यातली वाटावी अशी चिमुकली गावे . वेळ छान निघून जात होता . अधेमधे २/३ ठिकाणी ब्रेक घेतला . १२ वाजण्याच्या सुमारास आम्ही चिपलून मधे पोहोचलो. तिथून १० किमी वर एक टेकडी वर परशुरामांचे पुरातन मंदिर आहे तिथे धावती भेट दिली . समर्थ रामादासानी हनुमानाची उपासना करण्यासाठी बांधलेल्या अनेक मंदिरापैकी एक हनुमान मंदिर इथे पण आहे. मंदिर , पाण्याची कुंडे, पुरातन बांधकामे .. मन अगदी प्रसन्न झाले.


परशुराम मंदिर !



परत चिपलून मधे येउन वेळनेश्वर च्या मार्गी लागलो. बरयापैकी जेवणाची वेळ झाली होती . वाटेत कुठल्यातरी मस्त होटेल मधे थांबुन फिश करी आनी इतर तत्सम कोकणी पदार्थ खाऊन ट्रिपची झकास सुरुवात करावी असा माझा बेत होता. त्यात "जेवण तयार आहे !! " असे आपुलकीने भरलेले बोर्ड रस्त्याच्या बाजूला अधून मधून दिसत होते. जेवणाचा बेत इतराना सांगितल्यावर मला समजले कि राजू ,संदीप भानु आणि अमोल यांनी घरून येताना १ दिवस पुरेल इतका टिफिन घेउन आले आहेत. त्यांच्या घरच्यानी आमच्यासाठी सुद्धा जेवण बनवून दिले होते. .. बेस्ट .. छान .. मनातल्या मनात त्यांच्या फॅमिलीला दाद दिली. छोट्या छोट्याच गोष्टी पण सांगायला शब्द पण थिटे पडतील.... होटेल मधे बसून जेवन्यापेक्षा एकादे मस्त डेरेदार झाड़ आणि पाणी असणारे ठिकान शोधून तिथेच जेवण करुण घ्यावे असे ठरले. चिपलून वरुण वेळनेश्वराला जाण्यासाठी गुहागर च्या रोडने जावे लागते १५-२० किमी गेल्यानंतर डावीकडे फाटा जातो तो रस्ता सरळ वेळनेश्वरला जातो . आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो. वाटेत एक छोटी नदी लागली मग काय पटकन कार पार्क करून डबे मोकळे करून मस्त जेवण करून घेतले. अगदी अप्रतिम मेनू होता आणि त्यात मस्त वातावरण मग काय किती खाल्ले आनी काय खाल्ले याचा हिशोब न करता समोर जे काय असेल त्याचा फडशा पाडला. जेवानानंतर अर्धा तास तिथेच घालून पुढे निघालो . आता वेळनेश्वर १० /१५ किमी राहिले असेल. त्यामुळे काही टेंशन न्हवते. थोडा वेळ विश्रांति करून पुढे निघालो. वाटेत हेदवी चे गणपति मंदिर लागले तिथे दर्शन घेउन पुढे निघालो.


हेदवी गणेश मंदिर!



शेवटी 5 च्या आसपास वेळनेश्वराला पोहोचलो. वेळनेश्वर हे अगदी छोटे गाव . जेमतेम ३० / ४० घरे असतील. एकदम शांत गाव आणि त्यात ३ दिवस सुट्ट्या असून सुद्धा जास्त पर्यटक न्हवते. मागच्या जानेवारी मधे अशीच ३ दिवस सुट्टी असताना अलीबाग ला गेलो होतो आणि तिथली गर्दी पाहून दुपारीच परत फिरलो होतो. एवढ्या गर्दी मधे जे सुट्टी घालवन्याचा आनंद घेऊ शकतात त्याना साष्टांग दंडवत घालावा वाटतो मला.. असो. तर वेळनेश्वरला काहीच गर्दी न्हवती . तेथील मंदिरात जाउन वेळनेश्वराचे दर्शन घेतले. मंदिर खुपच मोठे आनी प्रशस्त आहे.

वेळनेश्वर मंदिर!


सनसेट व्हायला थोडाच अवधि बाकी होता. त्यामुळे चौकशी करून मि. गोखले यांच्या घरी तेवढ्या वेळात पटकन रहायची व्यवस्था केली. अगदी समुद्र किनारयाला लागुनच घर होते. सगळे परत समुद्र किनारयावर परतलो. मि कैमरा घेउन फोटो काढू लागलो आनी बाकीचे समुद्रात पोहु लागले. सनसेट होता होता बरेच फोटो काढले काही मस्त लैंडस्केप मिळाले. सध्या वाइड अँगेल लेंस ला फार फार मिस करत आहे . लवकरच १०-२२ मिमी लेंस हातात येइल. :) .

वेळनेश्वर बीच !!







काही छान फोटो घेतले . तसा हा बिच बराच मोठा आहें अंदाजे ३/४ किमी पसरलेला असेल. आणि अगदी कमी गर्दी, नाहीच म्हणाला तरी चालेल. अगदी शांत आणि सुंदर , एकदम स्वच्छ बिच. मला तर हे लोकेशन अगदी मनापासून आवडल. थोड्या वेळ घालवून परत रूमवर आलो आणि फ्रेश होऊंन तयार झालो. जेवणासाठी समुद्र किनारयावरील एका होटल मधे अगोदरच सांगुन ठेवले होते.परत किनारयावर आलो , किनारयावर बसलो. पौर्निमेची रात्र , रिकामा ४/५ किमी लांब समुद्र किनारा. शांतता म्हणजे काय असते याचा अनुभव घ्याचा असेल तर एकदा इकडे प्लीज भेट दया.

वेळनेश्वर बीच वरील सूर्यास्त !!



जेवणाला अजुन थोडा वेळ बाकी होता. त्यामुळे आमच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. भानु आणि मला हेन्री शरिओर ची आठवण झाली. आम्ही दोघेही पक्के वाचक, गावी असताना तिकडे लायब्ररी मधील सगळी पुस्तके आम्ही वाचून काढली होती. त्यात एक "पपिलान" नावाचे मराठी अनुवाद झालेले हेन्री शरिओर चे पुस्तक तर आम्ही २०/३० वेळा वाचले असेल. अजुनही कधी कधी हे पुस्तक वाचतो. समुद्रावरची मस्त साहस कथा आहें "पपिलान".


वेळनेश्वर बीच वरील सूर्यास्त !!




चंद्र बराच वर आला होता. रात्रीचे ९ वाजले असतील. जेवण तयार आहें असा होटेल च्या मालकाने सांगितले. मस्त कोकणी फिश खाल्ली. कोकणात गेल्यावर कधी मेनू विचारत बसु नका. फिश शी रिलेटेड काहीही सांगा आणि चापून खा. ते टेस्टी असलेच पाहिजे. भरपेट जेवण झाल्यावर परत एक किनारयावर रपेट मारली . अगदी नीरव शांततेचा अनुभव ...


वेळनेश्वर बीच वरील चंद्रोदय !!




परत रूम वर आलो आणि बेड वर झोकुन दिले, सलग ड्रायविंग चा तसा काही त्रास न्हवता झाला. पण बराच शीन आला होता. रात्री गप्पा मारत मारत १२ वाजले.सकाळी लवकर ५:३० ला जाग आली. सगळे आवरून मि. गोखलेंचा निरोप घेतला आणि परत किनारयावर आलो


वेळनेश्वर बीच !!


तिथे थोडा वेळ घालवून गणपतिपुळे च्या दिशेने निघालो. कोकणातले रस्ते त्यामानाने बरे आहेत पण वाट चुकन्याचा चान्स १००% असतो म्हणून एकादा निर्मनुष्य ठिकाणी जर दोन किवा जास्त रस्ते असतील तिथेच थोडा वेळ वाट पहा, कुणालाही विचारून रस्ता कन्फर्म करा आणि मगच पुढे जा अन्यथा तुम्ही रस्ता चुकलाच असे समजा.





दुपारी १२ च्या आसपास गणपतिपुळेला पोहोचलो. मी तीसरी मधे असताना आमच्या मराठी शाळेची ट्रिप गणपतिपुळेला आली होती नंतर काही इकडे येण्याचा योग नाही आला. जवळपास 22 वर्षानी परत गणपतिपुळेला आलो होतो. गर्दी भरपूर होती . दर्शनासाठी रांगे मधे तासभर थांबून दर्शन घेतले आणि समुद्रकिनारी थोडा वेळ घालवून परत निघालो. घरी परतीचा प्रवास चालू झाला. हातखंबा ते कोल्हापुर हा रोड अगदी प्रेक्षनीय आहे. घाट अगदी वेड लावणारा आणि ड्रायविंगची अस्सल मजा देणारा आहे. पावसाळ्यात हा रोड आणि कोयना ते चिपलून हा रोड परत एक्स्प्लोर करायचे नक्की ठरवले. कोल्हापुर च्या अलिकडून म्हणजे मलकापुर मधून शिरोल मार्गे पेठ आणि नंतर पलुस असा प्रवास करत रात्री ८ च्या सुमारास घरी परतलो ते जुन्या आठवणी ताज्या करुन .... आयुष्यभर आठवणीत राहतील अश्या आठवणी मनाच्या कुपित साठवून, मरगळलेले मन परत फ्रेश करुन....

.......... आमची गँग अजुन आहे तशीच आहे आणि तशीच राहिल याची खात्री आहे......!!